वाशिम, अनसिंगमधील टोकनधारक शेतक-यांची तूर खरेदी आटोपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:21 PM2017-08-26T22:21:53+5:302017-08-26T22:40:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलै २०१७ पासून सुरू झालेली तूर खरेदी प्रक्रिया जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत असून ३१ आॅगस्ट ही अंतीम मुदत असताना २६ आॅगस्ट रोजीच सहा केंद्रांपैकी वाशिम आणि अनसिंग या दोन खरेदी केंद्रांवरील तूर खरेदी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी शनिवारी दिली.
३१ मे २०१७ पर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ५४२ तूर उत्पादक शेतकºयांना टोकन देण्यात आले होते. त्यानुसार, २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूरीची नोंद झाली होती. ही तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचे निर्देश शासनाने दिल्यावरून २६ जुलैपासून जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा लाड आणि रिसोड या सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी ३१ आॅगस्ट ही अंतीम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यास आणखी ४ दिवस शिल्लक असतानाच वाशिम आणि अनसिंग या केंद्रांवरील खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड या उर्वरित खरेदी केंद्रांवरील शिल्लक असलेली तूरही मुदतीच्या आत मोजून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक कटके यांनी दिली.
मालेगाव | २७५0 क्विंटल |
मंगरूळपीर | ११८२८ क्विंटल |
कारंजा | ३७९२९ क्विंटल |
रिसोड | १७९७६ क्विंटल |