तुरीने ओलांडला ११ हजाराचा टप्पा! मानोऱ्यात सर्वाधिक भाव; शेतकरी सुखावला
By संतोष वानखडे | Published: June 5, 2023 07:02 PM2023-06-05T19:02:48+5:302023-06-05T19:03:05+5:30
देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून जात आहे.
वाशिम : मागील तीन-चार दिवसांपासून तुरीच्या दरात झपाट्याने तेजी येत असून, सोमवारी (दि.५) मानोरा बाजार समितीत तुरीला प्रती क्विंटल ११ हजार १११ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा प्रथमच तुरीला प्रतिक्विंटल साडेदहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर तुरीला विक्रमी दर प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून जात आहे.
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात होणारे भावाचे चढउतार पाहता पूर्ण देशभरात होणारे पीक यावर आता बाजारपेठेतील भाव ठरतात. जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. गतवर्षी ४० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसाचा तुरीला फटका बसला. त्यात ऐन फुलधारणेच्यावेळी धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच तुरीला बाजारात बऱ्यापैकी दर मिळत आहे. सध्या स्थितीत तूरीने उच्चांक गाठल्याचे दिसून येते. मानोरा बाजार समितीमध्ये विक्रमी ११ हजार १११ चा दर मिळाला. याठिकाणी ५०० क्विंटल आवक झाली. वाशिम बाजार समितीत ९५००-१०४५० असा भाव मिळाला.