शिरपूर परिसरात हळद बेणे लागवडीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:30 AM2021-05-28T04:30:07+5:302021-05-28T04:30:07+5:30
शिरपूर परिसरात साधारणत: १५ वर्षांपूर्वी मोजक्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती. तेच शेतकरी हळदीचे उत्पादन घेत असत. कालांतराने सिंचन सुविधा ...
शिरपूर परिसरात साधारणत: १५ वर्षांपूर्वी मोजक्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती. तेच शेतकरी हळदीचे उत्पादन घेत असत. कालांतराने सिंचन सुविधा वाढत गेल्या, तसे हळद लागवड क्षेत्रातही वाढ होऊ लागली. मागील काही वर्षात वाशिम जिल्ह्यात शिरपूर परिसर सर्वाधिक हळद उत्पादन करणारा भाग म्हणून ओळखला जात आहे. २०२०-२१ मध्ये शिरपूर परिसरातील जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी एक लाख क्विंटलपेक्षा अधिक हळदीचे उत्पादन घेतले. यामध्ये एकट्या शिरपूर येथील १५०० शेतकऱ्यांचा समावेश होता. २०२१-२२ च्या हंगामातही शिरपूर येथील सुमारे २५०० शेतकरी हळद लागवड करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, लागवडीचे काम सुरू झाले असून दिलीप बाविस्कर या शेतकऱ्याने २२ मे रोजी हळद लागवड केली. परिसरातील करंजी, वाघी, शेलगाव, दुधाळा, पांगरखेडा, मिर्झापूर, घाटा, किन्ही घोडमोड, वसारी, तिवळी, गौळखेडा येथील शेतकरी सुध्दा यंदा हळद लागवड करणार आहेत.
..............
हळदीची विक्री हिंगोली, वसमतमध्ये
वाशिम जिल्ह्यात हळद विक्रीची प्रभावी सुविधा अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हळद विक्रीसाठी परिसरातील शेतकऱ्यांना हिंगोली, वसमत येथे जावे लागते. स्थानिक स्तरावर मोठी बाजारपेठ उभी झाल्यास लागवड क्षेत्रात वाढ होण्यासोबतच शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचाही फायदा होणे शक्य आहे.