हळद पिकामुळे मजुरांना राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:49+5:302021-03-31T04:41:49+5:30
सिंचनाच्या सोयी नसल्याने पूर्वीच्या काळात पूर्ण शेती पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून होती. म्हणजेच कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक होते. मागील ...
सिंचनाच्या सोयी नसल्याने पूर्वीच्या काळात पूर्ण शेती पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून होती. म्हणजेच कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक होते. मागील काही वर्षांत बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वखर्चातून सिंचन व्यवस्था केली, तर काही शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतून सिंचनविहिरी, शेततळ्याचा लाभ घेतला. तसेच शिरपूर
परिसरात रखडलेला मिर्झापूर सिंचन प्रकल्प ही दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला. परिणामी काही वर्षांपासून शिरपूर परिसरात हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आता तर वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूरमध्ये आहेत. हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सहाजिकच त्यातून शेतमजुरांना रोजगार निर्मिती झाली आहे. सध्या शिरपूर परिसरात हळद काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. हळद वेचणीची मजुरी प्रति कॅरेट वीस रुपयेप्रमाणे मिळत आहे. मजूर सकाळी पाचपासूनच हळद वेचणीसाठी शेतात जात आहेत. तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मजुरांना मजुरी मिळत आहे. सिंचन सुविधांमुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली. हळद पिकामुळे शेतमजुरांना अधिक दिवस रोजगार प्राप्त होत आहे. मागील वर्षीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यापर्यंत शेतमजुरांना हळद पिकामुळे काम उपलब्ध झाले. यावर्षीही हळदीमुळे मजुरांना अधिक दिवस रोजगार मिळणार आहे.