अपेक्षीत दराअभावी हळद उत्पादक शेतकरी हताश
By Admin | Published: May 26, 2017 07:16 PM2017-05-26T19:16:58+5:302017-05-26T20:18:11+5:30
लागवडीचा खर्चही निघेना: विक्रीचा विचारच स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: चांगले उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देऊन हळदीची लागवड करणारे शेतकरी अपेक्षीत दराअभावी हताश झाले आहेत. हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत केलेला खर्चही निघेनासा झाल्यामुळे मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनमधील २५ शेतकऱ्यांनी हळद विकण्याचा विचारच स्थगित केला आहे.
शिरपूर जैन येथील ५० हून अधिक शेतकऱ्यांनी मिळून यंदा तब्बल १ हजार २०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली होती. चांगले उत्पन्न मिळवून आर्थिक विकास साधला जावा, या उद्देशाने येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिक पद्धतीला फाटा दिला होता. हळदीच्या पिकासाठी शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास ७५ हजार रुपये एकरी खर्च आला. चांगले उत्पादन होण्यासाठी शेतकऱ्यांनी परिश्रमही घेतले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एकरी २५ क्विंटलपर्यंतचे उत्पादन झाल, तर इतर शेतकऱ्यांना सरासरी १८ ते २० क्विंटलचे उत्पादन झाले; परंतु आता या पिकाला सरासरी चार हजार ८०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघणे अशक्य झाले आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हताश झाले असून, २५ शेतकऱ्यांनी हळदीची विक्री करण्याचा विचारच स्थगित केला आहे.