वाशिम जिल्ह्याला अडीच लाख शिधा किट मंजूर; गुढीपाडव्यानंतरच लाभार्थींना मिळणार 'आनंदाचा शिधा
By दिनेश पठाडे | Published: March 20, 2023 05:56 PM2023-03-20T17:56:50+5:302023-03-20T18:00:35+5:30
जिल्ह्याला २ लाख ५२ हजार ८६ शिधाजिन्नस किट गुरुवार(दि.१६) रोजी मंजूर झाल्या आहेत.
वाशिम : गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीत अंत्योदय, अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच दारिद्र्यरेषेखालील (एपीएल) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो, चणा डाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेली किट प्रतिशिधापत्रिका ई-पॉसप्रणालीद्वारे शंभर रुपये या दराने वितरित केली जाणार आहे.
जिल्ह्याला २ लाख ५२ हजार ८६ शिधाजिन्नस किट गुरुवार(दि.१६) रोजी मंजूर झाल्या आहेत. त्यानंतर तालुका गोदामापर्यंत संच पोहोचविण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. मात्र, अद्याप जिल्ह्यात शिधा किट उपलब्ध झाल्या नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.
शासन निर्णयानुसार लाभासाठी पात्र ठरणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा प्रति किट १०० रुपये या सवलतीच्या दराने वितरित करण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने त्या-त्या जिल्ह्याला शिधा जिन्नस किट मंजूर करण्यात आली असून, त्यानुसार तालुका गोदामापर्यंत संच पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय भांडार विभागाला दि. १६ मार्च रोजी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहेत.
आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, त्यानुसार किट वाटप केली जाणार आहे. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाणार आहे.
दरम्यान, सोमवारपर्यंत आनंदाचा शिधा किट जिल्ह्यात उपलब्ध झाली नाही. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काहीशी अडचण वितरणावेळी येणार आहे. मात्र, पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गुढीपाडवा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अद्याप जिल्ह्यात शिधाजिन्नस संच उपलब्ध न झाल्यामुळे गुढीपाडव्यापूर्वी पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा किट मिळणे कठीण आहे. मात्र, पुढील महिनाभरात आनंदाचा शिधा किट वाटप करण्याचा निर्णय असल्याने लाभार्थींना या कालावधीत किट उपलब्ध केल्या जाणार आहेत.
काय सांगते आकडेवारी
अंत्योदय योजना कार्डधारक--४७३५८
प्राधान्य कुटुंब योजना कार्डधारक--१९०२६८
एपीएल शेतकरी योजना(दारिद्र रेषेवरीलसह)--१८२९९
जिल्ह्याला शिधाजिन्नस पुरविण्यास गुरुवारी मान्यता मिळाली आहे. त्यानुसार अडीच लाखांवर शिधा किट उपलब्ध होणार आहेत. शिधा किट प्राप्त होताच पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याल्या जाणार आहेत.
-राजेश वझिरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम