म्हशीच्या पोटात निघाले अडीच तोळे सोने; सार्सी येथील प्रकार; शस्त्रक्रियाकरून पोत काढली बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 09:02 PM2023-09-29T21:02:22+5:302023-09-29T21:03:12+5:30
म्हशीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ देखील फस्त केली. तेवढ्यात लक्षात आले की, त्या ताटात सोन्याची पोत ठेवली होती.
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील सार्सी येथे अजब प्रकार समोर आला आहे. एका म्हशीने चक्क अडीच तोळ्याची पोत खाल्याचे सोनाग्राफीवरुन स्पष्ट झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन पोत बाहेर काढण्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले. म्हशीवर वाशिम येथे २७ सप्टेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. याबाबतचे व्हिडिओ २९ सप्टेंबरला व्हायरल झाले.
याबाबत सविस्तर असे की, सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर हे शेती करतात. त्यांच्याकडे गुरे, ढोरे आहेत. तसेच एक म्हैस देखील आहे. संध्याकाळी शेतातून घरी येताना ते सोयाबीनला आलेल्या लाल शेंगा घरी घेऊन आले. त्यांनी या शेंगा घरातल्या महिलांकडे दिल्या. त्यानुसार महिलांनी सोयाबीनच्या शेंगा सोलायला घेतल्या. टरफले ताटात काढून टाकली. त्यानंतर रात्री झोपताना उशा शेजारीच असलेल्या या ताटात गीताबाई भोयर यांनी गळ्यातील सोन्याची पोतही काढून ठेवली. ही पोत जवळपास अडीच तोळ्यांची होती. त्यानंतर सकाळी हेच ताट म्हशीसमोर ठेवण्यात आले. म्हशीने ह्या शेंगा खाता खाता सोन्याचीही पोतही गिळून टाकली. अखेरीस पोत गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर म्हशीवर शस्त्रक्रिया करुन सोन्याची पोत परत मिळवण्यात आली.
सोनाग्राफी केली अन् पोत असल्याचे कळले
म्हशीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ देखील फस्त केली. तेवढ्यात लक्षात आले की, त्या ताटात सोन्याची पोत ठेवली होती. हे बघून घरातील सर्वाची एकच धांदल उडाली. त्यांनी तातडीने डॉ. ज्ञानेश्वर इढोळे यांना कळविले. त्यांनी तातडीने वरिष्ठ डॉक्टरांसोबत संपर्क साधला आणि म्हशीला घेऊन वाशिम येथील जनावराच्या रुग्णालयात पोहचले. मेटल डिटेक्शन वरून म्हशीच्या पोटात काहीतरी असल्याची खात्री करण्यात आली त्यानंतर म्हशीची सोनोग्राफी करून डॉ. बाळासाहेब कौंडिन्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हशीची यशस्वी शस्त्रक्रिया केली व तिच्या पोटातील सोन्याची पोत बाहेर काढली.