गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा संकलनासाठी दोन घंटागाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:57+5:302021-04-14T04:37:57+5:30
वाशिम : गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरातील कचरा संकलनासाठी वाशिम नगर परिषदेतर्फे दोन घंडागाड्यांची स्वतंत्र व्यवस्था केली असून, स्वतंत्रपणे कचरा ...
वाशिम : गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरातील कचरा संकलनासाठी वाशिम नगर परिषदेतर्फे दोन घंडागाड्यांची स्वतंत्र व्यवस्था केली असून, स्वतंत्रपणे कचरा संकलन करण्यात येतो, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी दिली.
जिल्ह्यासह वाशिम शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या परंतु सौम्य लक्षणे असणारे अनेक रुग्ण तहसीलदारांच्या परवानगीने गृहविलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत. गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांच्या घरातील कचरा संकलन स्वतंत्रपणे होण्यासाठी नगर परिषदेने दोन घंटागाड्यांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे, असे मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले. वाशिम शहरात जवळपास १२० ते १४० रुग्ण हे गृहविलगीकरणात राहत असून, जास्त रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्तही लावण्यात येत आहे. शहरातील कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्यांची सुविधा उपलब्ध असून, गृहविलगीकरणातील रुग्णाच्या घरातील कचरा संकलन करण्यासाठी दोन स्वतंत्र घंटागाड्याची व्यवस्था केली. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका टळणार आहे. या कचऱ्याची विल्हेवाट डम्पिंग ग्राऊंड येथे योग्य पद्धतीने केली जाते.
००००
वाशिम शहरात गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णाच्या घरातील कचरा संकलन करण्यासाठी दोन घंटागाड्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने केली जात आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने शहरवासीयांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
- दीपक मोरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम.