एकबुर्जी प्रकल्पातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू!
By संतोष वानखडे | Published: August 29, 2022 09:34 PM2022-08-29T21:34:34+5:302022-08-29T21:35:22+5:30
वाशिम शहराची तहान भागविणारा एकबुर्जी प्रकल्प पाण्याने तुडूंब भरला आहे.
वाशिम (संतोष वानखडे) : वाशिम शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एकबुर्जी प्रकल्पातील पाण्यात बुडून वाशिम येथील दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. शे. शोएब शे. अन्सार (१८) व शे. आवेश शे. अनिस (१५) अशी मृतकांची नावे आहेत.
वाशिम शहराची तहान भागविणारा एकबुर्जी प्रकल्प पाण्याने तुडूंब भरला आहे. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने एकबुर्जीकडे वळत आहेत. सोमवारी (दि.२९) वाशिम शहरातील काही मुले पोहण्यासाठी या प्रकल्पावर गेले होते. पोहणे नसल्याने आणि खोल पाण्यात गेल्याने शे. शोएब शे. अन्सार व शे. आवेश शे. अनिस दोघेही रा. वाशिम या दोन मुलांना पाण्यातून बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले. वाशिम येथील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता, तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका प्रशासनाने पोलीस प्रशासनाला माहिती दिली असून, पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.