विठोली येथे दोन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:03+5:302021-05-06T04:44:03+5:30
००००० रस्ता दुरुस्तीची मागणी वाशिम : रिधोरा-पांगराबंदी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून, रस्ता ...
०००००
रस्ता दुरुस्तीची मागणी
वाशिम : रिधोरा-पांगराबंदी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली.
०००००
करवसुलीवर होणार परिणाम
वाशिम : नगर परिषद, ग्रामपंचायतींचा बहुतांश कारभार दरवर्षी गोळा होणाऱ्या करामधूनच चालतो. मात्र कोरोना संकटामुळे सर्वसामान्य कुटुंब अडचणीत सापडले असून,त्याचा करवसुलीवर परिणाम होणार असल्याचे वाशिम तालुक्यात दिसून येत आहे.
००००००००
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेकडे लक्ष
वाशिम : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण निश्चित झाले असून, त्यानुसार प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या केव्हा होतात, समुपदेशन पद्धतीने पदस्थापना मिळणार का? याकडे लक्ष लागून आहे.
००००
जऊळका परिसरात स्वच्छतेचा बोजवारा
वाशिम : स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)अंतर्गत २०१९ मध्ये जनजागृती करीत उघड्यावरील शौचास जाणाऱ्यांवर कारवाई केली होती. यंदा कोरोनाकाळातही कारवाईची मोहीम सुरू आहे. मात्र, नागरिक मोठ्या संख्येने उघड्यावर शौचास जात असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे जऊळका परिसरात दिसून येते.
0000
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : रोजगार हमी योजनेत कार्यरत ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाही. मानधनात वाढ नाही तसेच दरमहा पहिल्या आठवड्यात मानधनही मिळत नाही. दोन महिन्याचे मानधन प्रलंबित आहे.
००
कोरोना संसर्ग उपयांचा आढावा
वाशिम: दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी वाशिम तालुका प्रशासनाकडून कोरोना संसर्ग उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
००
व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
वाशिम : दर १५ दिवसाला व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार कोरोना चाचणी केली जात आहे. दुकानांमध्ये निगेटिव्ह प्रमाणपत्र ठेवणे आवश्यक आहे.
000
प्रोत्साहन अनुदानाची मागणी
वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी केली. राज्य शासनाने घोषणेनुसार अनुदान देणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.
000
मीटर रीडिंग न घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी
वाशिम : रिसोड, वाशिम, मालेगाव शहरातील अनेक ग्राहकांना मीटर रीडिंग न घेताच वारेमाप देयके आकारण्यात येत असल्याने ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. मीटर रीडिंग न घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
000
पर्यटनस्थळांच्या विकासाची प्रतीक्षा
वाशिम : मालेगाव तालुक्यातील डव्हा, शिरपूर यासह अन्य पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना अद्याप विकासाची प्रतीक्षा लागून आहे. पर्यटनस्थळांचा विकास होण्यासाठी शासनाने भरघोस निधी पुरवावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
00
पोलीस पाटलांना प्रोत्साहन भत्ता द्यावा
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेव्हल’वर पोलीस पाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत असून, मानसिक धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
00
भर जहागीर येथे तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथे आणखी दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाने जवळपास १५ जणांची तपासणी केली आहे.