ट्रक-कार अपघातात माय-लेक ठार, बाप-लेक गंभीर; मेहकर-वाशिम मार्गावरील घटना
By दादाराव गायकवाड | Published: October 25, 2022 07:57 PM2022-10-25T19:57:05+5:302022-10-25T19:58:15+5:30
लिलाधर श्रीराम चोपडे हे पनवेल येथून त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह एमएच ४६, एयू, ३०८९ क्रमांकाच्या कारने वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील परसुडी काकडा येथे जात होते.
वाशिम : ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर वडील आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मेहकर-वाशिम मार्गावर मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटेनजिक २५ ऑक्टोबरला सायंकाळ ४.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींची प्रकृतीही गंभीर असून सोनू लिलाधर चोपडे (अंदाजे वय ३५ वर्षे), असे मृत महिलेचे नाव असल्याचे समजते.
लिलाधर श्रीराम चोपडे हे पनवेल येथून त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह एमएच ४६, एयू, ३०८९ क्रमांकाच्या कारने वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील परसुडी काकडा येथे जात होते. मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटेनजिक त्यांच्या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. यात अपघातात त्यांची पत्नी सोनू लिलाधर चोपडे आणि १३ वर्षीय मुलगा ठार झाला, तर स्वत: लिलाधर चोपडे आणि त्यांचा ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
दोन्ही जखमींना तातडीने १०८ रुग्णवािहकेने वाशिम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.