अपघातात दोन ठार
By admin | Published: August 17, 2015 01:33 AM2015-08-17T01:33:58+5:302015-08-17T01:33:58+5:30
कंटेनरची बोलेरोला धडक; एक गंभीर.
कारंजा लाड (जि. वाशिम) : डाळिंब घेऊन जात असलेल्या बोलेरो पीकअपला कंटेनरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार १६ ऑगस्ट रोजी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजापासून तीन किमी अंतरावर असलेल्या नवीन बायपासवरीला प्राप्ती हॉटेलजवळ घडली.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथून एमएच २८ एबी - ३९३८ क्रमांकाची बोलेरो पीकअप ही गाडी डाळिंब घेऊन नागपूरमार्गे जबलपूरकडे चालली होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार्या एमएच ४३, यू- ३६६६ क्रमांकाच्या कंटेनरने या बोलेरो पीकअपला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत बोलेरो पीकअपचा चालक मनोज एस. दुतोंडे (३८) रा. नायगाव दत्तापूर, ता. मेहकर जि. बुलडाणा व एक प्रवासी जागीच ठार झाला. तसेच कंटेनरमधील चालक सुखविंदर सिंग (५0) रा. मुंबई गंभीर जखमी झाला. प्रथमोपचारानंतर जखमीस पुढील उपचारासाठी अकोला हलविण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बोलेरो पीकअपचा अक्षरश: चुराडा झाला होता. तसेच बोलेरो पीकअपमधील डाळिंब रस्त्यावर पडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली. तसेच सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई यांनी जखमी व मृतकास रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेचा अधिक तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे.