वाशिम जिल्ह्यात तीन अपघातात दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 02:55 PM2019-08-17T14:55:24+5:302019-08-17T14:55:27+5:30
तीन अपघातात दोन जण ठार तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १५ व १६ आॅगस्ट रोजी वाशिम, आमगव्हाण व कारंजा येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात तीन अपघातात दोन जण ठार तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १५ व १६ आॅगस्ट रोजी वाशिम, आमगव्हाण व कारंजा येथे घडली. अंकित भंडारे रा. वाशिम, मनोज डंबाळे रा. मांडवा ता. दिग्रस असे मृतकाचे तर विवेक राजेंद्र मोडक रा. पिंप्री मोडक असे जखमीचे नाव आहे.
वाशिम : समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी बसच्या मागील चाकात सापडून वाशिम येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा ते पोस्ट आॅफिस चौक या दरम्यान १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८.४० वाजताच्या सुमारास घडली. शहरातील नालंदा नगरातील अंकित भंडारे (२२) हा दुचाकीने जात असताना खासगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तो खासगी बसच्या मागील चाकात सापडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या आवारात खासगी बस उभी केली असून, पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत.
बसने दुचाकीस्वारास उडविले
मानोरा : मानोरा - मंगरुळपीर मार्गावरील आमगव्हाणनजीक १५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान महामंडळाच्या बसने विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने मनोज रामभाऊ डंबाळे हे जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला. मनोज रामभाऊ डंबाळे रा.मांडवा ता.दिग्रस हे सावरगाव कान्होबा येथे एच.एच.३७ एच.४०२९ क्रमांकाच्या दुचाकीने देवदर्शनाला जात असतांना विरुध्द दिशेने येणाºया एम.एच.०७ सी ९२८१ क्रमांकाच्या बसच्या चालकाने जबर धडक दिल्याने मनोज डंबाळे हे जागीच ठार झाले तर त्यांचे सोबत असलेले सुधाकर डांबरे हे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी सुधाकर डांबरे यांच्या तक्रारीवरुन बस चालकाविरुध्द कलम २७९, ३३४, ३०४, भादंवीनुसार गुन्हा दाखल करुन सदर बस मानोरा पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली. या प्रकरणाचा तपास बिट जमादार प्रकाश भगत करीत आहेत.
दुचाकीस्वार गंभीर जखमी
कारंजा लाड : अज्ञात वाहनाने दुचाकीस मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा ते मुर्तिजापूर मार्गावरील कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ १४ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. विवेक राजेंद्र मोडक रा. पिंप्री मोडक (३४) असे जखमीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे श्याम सवाई, सुमेद बागडे व सुनील हिंगणकार यांनी घटनास्थळी गाठून प्राथमिक उपचारासाठी जखमीला कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जखमीला अमरावती येथे पाठविण्यात आले. दरम्यान वृत्तलिहेस्तोवर घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती.