वाशिम जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ५३३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:54 PM2020-07-28T12:54:46+5:302020-07-28T12:54:59+5:30
२८ जुलै रोजी आणखी दोन रुग्णांची भर पडली. आता कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ५३३ वर पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, २८ जुलै रोजी आणखी दोन रुग्णांची भर पडली. आता कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ५३३ वर पोहचली असून, यापैकी २०४ रुग्ण अॅक्टिव्ह (सक्रिय) आहेत.
जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजन, संचारबंदी व लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मे महिन्यात परराज्य तसेच परजिलह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर अधिक ताण येऊ नये म्हणून तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथेही स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली. स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. २८ जुलै सकाळी प्राप्त अहवालानुसार दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये कारंजा लाड तालुक्यातील मोहगव्हाण येथील ५० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. हा व्यक्ती मुंबई येथून परतला आहे. तसेच मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील ६ वर्षीय मुलगा कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून तो यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३३ झाली असून, यापैकी ३१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. २०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.