उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली दुचाकी; दोन जण जागीच ठार
By दादाराव गायकवाड | Updated: October 27, 2022 17:43 IST2022-10-27T17:41:59+5:302022-10-27T17:43:02+5:30
वाशिममध्ये उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.

उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली दुचाकी; दोन जण जागीच ठार
वाशिम: रस्त्यावर उभ्या नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रिसोड-लोणी मार्गावर मोरगव्हाण जवळ घडली. झनक आनंदा पारवे (३७ वर्षे) व चंद्रकांत कोंडुजी मोरे (३८ वर्ष) अशी मृतकाची नावे असून दोघेही चाकोली येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झनक आनंदा पारवे व चंद्रकांत कोंडुजी मोरे हे दोन युवक दुचाकीने रिसोड येथून त्यांच्या गावी चाकोलीकडे जाण्यासाठी निघाले होते.
या मार्गावर मोरगव्हाणनजिक एक नादुरूस्त ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभा होता. दुचाकीवर असलेल्या दोघांनाही हा ट्रॅक्टर उभा असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे भरधाव वेगात असलेली त्यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस धडकली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनधमील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले व अपघातग्रस्त दुचाकी ही ताब्यात घेऊन रिसोड पोलीस स्टेशनला जमा केली.