तूर विक्रीसाठी नोंदणी दोन हजार शेतकऱ्यांची ; खरेदी शून्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:57+5:302021-04-04T04:42:57+5:30
खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला मोठा फटका बसला. त्याचबरोबर उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये ...
खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला मोठा फटका बसला. त्याचबरोबर उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली आणि मागणी वाढली की दरात वाढ होते, या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे बाजार समित्यांत तुरीच्या दरात वाढ झाली. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर वाशिम तालुक्यातील २ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. परंतु, खुल्या बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तुरीची एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही.
.......................
हंगाम संपल्यानंतरही आवक सुरूच!
हंगाम संपल्यानंतरही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक अद्याप सुरूच आहे. तुरीला भावही प्रतिक्विंटल ६ हजारांपेक्षा अधिक मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरी क्विंटलमागे सरासरी ५०० रुपये अधिक पडत आहेत.
...................
शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
दरवर्षी खरेदी केंद्रावर सोयाबीन, तूर, हरभरा विक्रीसाठी रांगा लागत असतात. परंतु, यंदा बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने एकाही शेतकऱ्याने नाफेडकडे तूर विक्री केली नाही. तूर विक्रीसाठी दोन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती व सर्व शेतकऱ्यांना मॅसेज पाठविण्यात आले, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.