वाशिममार्गे दोन रेल्वे गाड्या; प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:09 PM2020-12-04T12:09:21+5:302020-12-04T12:09:48+5:30
Washim Railway News हैदराबाद -जयपूर उत्सव विशेष गाडी २ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवार आणि बुधवारी धावणार आहे.
वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात वाशिममार्गे दोन रेल्वे गाड्या धावत असून, यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशांतर्गत दळणवळणाच्या दृष्टिकोनातून वाशिम येथे फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अकोला येथील रेल्वेस्थानक गाठावे लागते. काही रेल्वे गाड्या वाशिममार्गे धावत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळत आहे.
हैदराबाद -जयपूर उत्सव विशेष गाडी २ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवार आणि बुधवारी धावणार आहे. ही गाडी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री २०.२५ वाजता सुटणार असून, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोलामार्गे जयपूर येथे सकाळी ५.२५ वाजता पोहोचणार आहे. जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी ही ४ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान दर बुधवार आणि शुक्रवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी १५.२० वाजता सुटणार असून, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेडमार्गे हैदराबाद येथे मध्यरात्री १२.४५ वाजता पोहोचणार आहे. याशिवाय अमरावती-तिरुपती या विशेष गाडीस ३१ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. तिरुपती-अमरावती द्वी साप्ताहिक उत्सव विशेष ही गाडी तिरुपती येथून दर मंगळवार आणि शनिवारी धावणार आहे. या गाडीला १ ते २९ डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी १ डिसेंबरपासून तिच्या बदललेल्या वेळेनुसार तिरुपती येथून दुपारी ३.४० वाजता सुटणार असून काचीगुडा, निझामाबाद, नांदेड, पूर्णा, वाशिम, अकोला मार्गे अमरावती येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचणार आहे. अमरावती ते तिरुपती द्विसाप्ताहिक उत्सव विशेष ही गाडी अमरावती येथून दर सोमवारी आणि गुरुवारी बदललेल्या वेळेनुसार सकाळी ६.४५ वाजता सुटणार आहे.