वाशिम जिल्ह्यात धावताहेत एकाच क्रमांकाची दोन वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:52 AM2020-10-02T11:52:03+5:302020-10-02T11:52:45+5:30
Washim RTO News सारख्याच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचे मेसेज संबंधित वाहनाच्या मालकाला पाठविले जातात. यातूनच जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कुठल्याही वाहनाची नोंदणी झाल्यानंतर त्या वाहनाचा क्रमांक निश्चित केला जातो. याची रितसर नोंदणी होते. त्यात एकच क्रमांक कुठल्याही दोन वाहनांना दिला जात नाही. उदा.: एखाद्या दुचाकीस एमएच-३७, ए ३५१५ हा क्रमांक देण्यात आल्यास तो क्रमांक दुसºया दुचाकीस मिळत नाही. तथापि, या क्रमांकाशी साधर्म्य असलेला उदा.: एमएच-३७, सी ३५१५ असा क्रमांक मिळू शकतो.
सारखा क्रमांक देताना अक्षरात बदल केला जातो. अर्थात मालिका बदल होते. जिल्ह्यात मात्र सारख्याच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. त्यात १२ सप्टेंबरला एमएच-३७, एस-४९०९ क्रमांकाच्या दुचाकीवर नियम उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी दंडाची कारवाई केली, तर ३० सप्टेंंबरला याच क्रमाकांच्या दुचाकीवर पुन्हा पोलिसांनी कारवाई केली.
त्यात ३० सप्टेंबरला कारवाई झालेल्या दुचाकीचालकाला दंडाचा मेसेज आला. त्यात १२ सप्टेंबरच्या कारवाईचाही मेसेज होता. प्रत्यक्षात त्यांच्या अधिकृत नोंदणी असलेल्या दुचाकीवर एकच कारवाई झाली आहे. या प्रकारामुळेच जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचे सिद्ध होते.
जिल्ह्यात एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी कशा, याचा शोध पोलिसांच्या सहकार्याने घेऊन नेमका काय प्रकार आहेत, तो उजेडात आणून कठोर कारवाई केली जाईल.
- एस. व्ही. हिरडे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम