शहरातील गणेशपेठ, दंडे चौक परिसरात दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:30+5:302021-02-24T04:42:30+5:30
मागील काही दिवसांपासून वाशिम शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकी चोरीसह दुचाकीचे महत्त्वाचे साहित्य व बॅटऱ्या, चारचाकी वाहनांचे साहित्य व बॅटऱ्या ...
मागील काही दिवसांपासून वाशिम शहराच्या विविध भागांमध्ये दुचाकी चोरीसह दुचाकीचे महत्त्वाचे साहित्य व बॅटऱ्या, चारचाकी वाहनांचे साहित्य व बॅटऱ्या आणि इतर गृहोपयोगी साहित्याची चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील १५ दिवसांच्या कालावधीमध्ये शहरातील गणेशपेठ व दंडे चौक परिसरात जुन्या बालाजी मंदिर परिसरातील काही दुचाकींच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. एवढेच नव्हे तर अनेक दुचाकींच्या पेट्रोलचीही चोरी सुरू असल्यामुळे या भागांतील नागरिक भयभीत झाले आहेत. काही चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्यासुद्धा चोरीस गेल्याचे समजते. या सर्व छोट्या-मोठ्या चोऱ्यांसह या भागात सक्रिय असलेले चोरटे घरातील साहित्याचीसुद्धा चोरी करीत असल्याच्या घटनांमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारांबाबत या भागातील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही आजपर्यंत शहर पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याची खंत या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
वाशिम शहर पोलिसांनी शहरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त लावावा, रात्रीची गस्त वाढवावी, दंडे चौक, गणेशपेठ भागांमध्ये, जुन्या नगर परिषदेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीसुद्धा या भागातील नागरिकांनी केली आहे.