वाहनाच्या धडकेत दोन युवक गंभीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:46+5:302021-08-24T04:45:46+5:30
वाशिम : दोन वेगवेगळ्या वाहन अपघातात दोन युवक गंभीर तर दोन वन्यप्राणी ठार झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ...
वाशिम : दोन वेगवेगळ्या वाहन अपघातात दोन युवक गंभीर तर दोन वन्यप्राणी ठार झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी किन्हीराजा ते वाशिम आणि मालेगाव ते शेलुबाजार या मार्गावर घडली.
किन्हीराजा गावापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर काटेपूर्णा अभयारण्य आहे. तसेच कवरदरी, रामराववाडी, पिंपळशेंडा, माळेगांव, जोगलदरी, धरमवाडी, चोरद या ठिकाणी घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परिसरात हरीण, रोही, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राणी व पशुपक्षी आढळून येतात. २२ ऑगस्ट रोजी नागपूर ते औरंगाबाद या द्रूतगती मार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्या कारने किन्हीराजा परिसरातील एका हॉटेलसमोर रोहीला धडक दिली. यामध्ये रोही जागीच ठार झाला तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत किन्हीराजा ते वाशिम या मार्गावरील कार्ली गावाजवळ भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या रोहीला धडक दिली. यामध्ये रोही ठार झाला तर दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद नसल्याने जखमींची नावे कळू शकली नाहीत.
००००००
सूचना फलक केव्हा लागणार?
नागपूर ते औरंगाबाद या महामार्गावरील गिव्हा फाटा ते सोनाळा फाटा हा ५ ते ६ कि.मी.चा रस्ता वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. याच ठिकाणी वाहन अपघातात वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. संबंधित यंत्रणेने या ठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.