भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक, जागतिक फार्मासिस्टदिनीच फार्मासिस्ट ठार
By संदीप वानखेडे | Published: September 25, 2023 05:04 PM2023-09-25T17:04:58+5:302023-09-25T17:05:08+5:30
बुलढाणा ते माेताळा रस्त्यावरील घटना.
मोताळा : भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने ग्रामीण रुणालयात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ ही घटना २५ सप्टेंबर राेजी बुलढाणा ते माेताळा रस्त्यावर घडली़ चेतनकुमार कोवे (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे़ जागतिक फार्मासिस्ट दिनी एका फार्मासिस्टचा जागेवरच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.
बुलढाणा शहरातील चैतन्यवाडी येथे राहणारे चेतनकुमार कोवे हे मोताळा ग्रामीण रुग्णालय येथे फार्मासिस्ट म्हणून कर्तव्यावर हाेते़ ते २५ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथून आपली स्कुटी क्र. एम. एच. २८ बीआर १६३८ ने मोताळाकडे येत हाेते़ दरम्यान, त्यांच्या दुचाकीस मालवाहू वाहन ४०७ क्रमांक एमएच २३-१०३९ ने प्रियदर्शनी शाळेजवळ जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, या धडकेत चेतनकुमार कोवे हे रस्त्यावर काेसळले़ त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचे माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमी फार्मासिस्ट कोवे यांना रुग्णवाहिकेने बुलढाणा येथे उपचारार्थ पाठविले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोवे यांचे वडील हे चंद्रपूर येथे नोकरीला असून त्यांचे ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हाेते.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा आप्त परिवार आहे. जागतिक फार्मासिस्ट दिनी एका फार्मासिस्टचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या मालवाहू वाहन चालकास बाेराखेडी पाेलिसांनी अटक केली. तसेच वाहनही जप्त केले आहे़ वृत्त लिहिस्ताेवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.