उंबर्डा बाजार बाल संरक्षण समितीने रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:15 PM2021-05-27T18:15:48+5:302021-05-27T18:17:43+5:30
Child Marriage averted : उंबर्डा बाजार बाल संरक्षण समितीने रोखला बालविवाह
वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे २७ मे रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह उंबर्डा बाजार येथील ग्राम बाल संरक्षण समितीने रोखला आहे.
या बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईनद्वारे वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षाला प्राप्त झाली. त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह वाशिम व अमरावती जिल्हा बाल संरक्षण कक्षाने उंबर्डा बाजार ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व इतर सदस्यांना बालविवाह रोखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ग्राम बाल संरक्षण समितीने सदर अल्पवयीन मुलगी तसेच मुलाकडील कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी समुपदेशन करून बालविवाह रोखला. जिल्हयात बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम यांनी केले.