रोजगार हमी अंतर्गत मजुरांना गावातच काम द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:37 AM2021-04-19T04:37:57+5:302021-04-19T04:37:57+5:30
वाशिम : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गरीब लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा कठीण परिस्थितीत मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी ...
वाशिम : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गरीब लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा कठीण परिस्थितीत मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावातच अकुशल कामगारांना काम उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना दिले. १६ एप्रिल रोजी ऑनलाईन बैठकीत त्यांनी या योजनेचा आढावा घेतला.
सर्व गट विकास अधिकारी यांनी शासन निर्णयानुसार कामाची योग्य तपासणी करुन प्रशासकीय मान्यता द्यावी तसेच गावातील मजुरांच्या मागणीनुसार कामे सुरु करण्याच्या सूचना दिल्या. सिंचन विहिरी व्यतिरिक्त पांदण रस्ता, अंतर्गत रस्ता, गुरांचे गोठे, सिंचन विहिरी, शेततळे, फळबाग लागवड, शाळा सौदर्यीकरण, अंगणवाडी, घरकुल, सिमेंट, नालाबांध, शोषखड्डे, नाडेप, वर्मी कंपोस्ट इत्यादी कामे प्रस्तावित करुन मजुरांना जास्तीत जास्त कामे देण्याचे निर्देश प्रभारी अध्यक्ष डॉ. गाभणे यांनी दिले. गावातील लोकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातून स्थलांतर न करता गावातच कामाची मागणी करावी आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. गाभणे यांनी केले.