उद्योगधंदे नसल्याने तालुक्यात बेरोजगारी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:44 AM2021-04-23T04:44:20+5:302021-04-23T04:44:20+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेरोजगारीचे चित्र बदलण्यासाठी तालुक्यात उद्योग-व्यवसायाला चालना देण्याची आवश्यकता आहे. अमानी येथील एमआयडीसीमध्ये नावाला एकही उद्योग ...
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेरोजगारीचे चित्र बदलण्यासाठी तालुक्यात उद्योग-व्यवसायाला चालना देण्याची आवश्यकता आहे.
अमानी येथील एमआयडीसीमध्ये नावाला एकही उद्योग सुरू नाही. त्या ठिकाणी ग्रामीण भागात महिला या बिबे फोडण्याचे काम करतात तेथेही मोजक्याच हाताला काम मिळत आहे. त्याचबरोबर तालुक्यात खासगी छोटे-मोठे उद्योग नसल्याने विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्याच हेतूने राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येथे लघू औद्योगिक क्षेत्र स्थापन झाले. लघू औद्योगिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी उद्योग निर्मितीसाठी अनेक जणांनी अत्यल्प किमतीत लीजवर भूखंड घेऊन ठेवले. या भूखंडधारकांनी अनेक वर्षांपासून उद्योग सुरू केले नाहीत. नव्याने उद्योग करणाऱ्यांना प्लॉट उपलब्ध नसल्याने ते उद्योग सुरू करू शकत नाहीत. ज्यांनी या क्षेत्रातील प्लॉट घेऊन अडवून ठेवले अशांवर संबंधित विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याने पुढील प्रक्रिया रखडल्या गेल्या आहेत. एकंदरीत उद्योग, व्यवसायाची अशी अवस्था असल्याने तालुक्यात रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा शासकीय, सहकारी किंवा खासगी एकही मोठा उद्योग उभा करण्यात आला नाही. काही युवक व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना कर्जसुविधा, सबसिडी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. भागभांडवलाअभावी अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. म्हणून अनेक युवक चहाविक्री करतात, काही इतर दुकानांवर काम करतात, त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे ही अपेक्षा व्यक्त होत आहे.