मालेगाव येथे नाफेड खरेदी पूर्ववत
By admin | Published: May 16, 2017 01:40 AM2017-05-16T01:40:21+5:302017-05-16T01:40:21+5:30
मालेगाव: शेतकरी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांमधील वादावर पडदा पडल्याने मालेगाव येथे नाफेडची खरेदी पूर्ववत झाली. सोमवारी जवळपास दोन हजार शेतकरी टोकनसाठी आले होते. यापैकी ६०० शेतकऱ्यांना टोकन मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: शेतकरी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांमधील वादावर पडदा पडल्याने मालेगाव येथे नाफेडची खरेदी पूर्ववत झाली. सोमवारी जवळपास दोन हजार शेतकरी टोकनसाठी आले होते. यापैकी ६०० शेतकऱ्यांना टोकन मिळाले.
मालेगाव येथील बाजार समितीच्या ओट्यावर इतरत्र मोकळी पडलेली तूर शनिवारच्या अवकाळी पावसामुळे ओली झाली होती. ओली झालेली ही तूर मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत वाद झाला. त्यामुळे शनिवारी येथील खरेदी बंद पडली. दोन दिवस शेतकऱ्यांना तूर मोजणीची प्रतिक्षा करावी लागली. सोमवारपासून तूर मोजणीला सुरूवात झाली. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीने मंडप व थंडपाण्याची व्यवस्था केली. सोमवारी मालेगाव बाजार समिती परिसरातील नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. सकाळपासूनच शेतकरी वाहनासह बाजार समितीत दाखल झाले. टोकन व नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर मोजणी करण्यात आली. तसेच टोकन मिळविण्यासाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांची रांग लागली होती. उन्हापासून बचाव म्हणून बाजार समितीने टाकलेल्या मंडपातच नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी फराळ व चहा, पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली. सुट्टीच्या दिवशीही खरेदी केली जाणार आहे. आजपर्यंत २० हजार क्विंटलची तूर खरेदी करण्यात आली, असे बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिकोनातून आवश्यक ती व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सभापती बबनराव चोपडे, उपसभापती प्रकाश पाटील अंभोरे, सचिव प्रकाश काढणे व कर्मचाऱ्यांनी दिली.
मालेगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडप, फराळ व थंडपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टोकन मिळविलेल्या शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी केली जात आहे. बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.
- बबनराव चोपडे, सभापती, बाजार समिती मालेगाव.
--