अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने पीक सुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:30+5:302021-07-21T04:27:30+5:30
रिसोड तालुक्यातील लोणी येथील आश्रृबा पंढरीनाथ बोबडे यांचे लोणी बु शिवारातील गट नं १३० मध्ये शेत आहे. ...
रिसोड तालुक्यातील लोणी येथील आश्रृबा पंढरीनाथ बोबडे यांचे लोणी बु शिवारातील गट नं १३० मध्ये शेत आहे. या शेतातील एक एकर क्षेत्रात त्यांनी तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. हे पीक बहरत होते. अशात २० जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान आश्रृबा पंढरीनाथ बोबडे शेतात गेले असता सोयाबीन व तुरीची पाने सुकलेली दिसली व कोण्या तरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी या पिकावर तणनाशकाची फवारणी केल्याचे लक्षात आले. गावातील प्रवीण पाटील, नीलेश बोडखे, भास्कर नरवाडे, अरविंद इंगोले, पारवे, रामेश्वर टकले, ग्रामसेवक घुगे, पोस्ट मास्टर समाधान पाटील, तसेच ग्रा.पं. सदस्य विनोद बोडखे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकारी काव्यश्री घोलप यांच्याशी संपर्क करून या पिकास वाचवण्यासाठी काय उपायोजना करता येतील याबाबत चौकशी केली असता त्यांनी युरियाचे खत पाण्यात २ टक्के प्रमाणात मिसळून फवारणी करण्यास सांगितले. फवारणी झाल्यानंतर सदर घटनेची माहिती कृषी सहायक तलाठी यांना दिली तरी तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांस नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.