जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस; पिके तरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:08+5:302021-08-18T04:48:08+5:30

जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कपाशी या सर्वच पिकांच्या ...

Universal rainfall in the district; Crops withered | जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस; पिके तरली

जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस; पिके तरली

Next

जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कपाशी या सर्वच पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असताना गत १३ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण पूर्वी समाधानकारक असले तरी सार्वत्रिक पावसाचा अभाव होता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, ते शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत होते; परंतु कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची स्थिती गंभीर होती. विशेष म्हणजे जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्राचेच प्रमाण अधिक असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. अशात सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात रात्रभर रिपरिप पाऊस पडला. सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे मोठा आधार मिळाला असून, शेतकरी वर्गात आता उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मंगळवारीही सर्वत्र पाऊस सुरूच होता.

--------------------

सोयाबीन, तूर, कपाशीला फायदा

मूग, उडीद या पिकांच्या शेंगा परिपक्व अवस्थेत आहेत, तर सोयाबीन पिकाच्या शेंगा अद्याप कोवळ्या आहेत. शिवाय तूर, कपाशी आणि ज्वारी ही पिके वाढीस लागली असतानाच पावसाने दडी मारल्याने ती संकटात सापडली होती. आता पावसाने हजेरी लावल्याने या पिकांना आधार झाला आहे.

---------------------

कारंजा, मानोऱ्यात दमदार पाऊस

जिल्ह्यात कारंजा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असतानाच गेल्या १४ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या तालुक्यातील पिकांची स्थिती गंभीर होती. सोमवारी मात्र कारंजा तालुक्यात २८.०७ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मानोरा तालुक्यात सर्वाधिक ३६.०० मि.मी. पाऊस पडला.

---------------------

तालुकानिहाय पडलेला पाऊस

तालुका - पाऊस (मि.मी.)

वाशिम - १४.००

रिसोड - ३.४

मालेगाव - १०.६

मंगरूळपीर - १४.५

मानोरा - ३६.००

कारंजा - २८.७

Web Title: Universal rainfall in the district; Crops withered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.