‘अनलॉक-४’: अर्थव्यवस्थेला मिळतेय उभारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 01:02 PM2020-09-07T13:02:28+5:302020-09-07T13:03:15+5:30
साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याच्या सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मिशन बिगीन अगेनअंतर्गत ‘अनलॉक-४’ची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून सुरू झाली. सकाळपासून सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजत असून, अर्थव्यवस्थेलाही उभारी मिळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून उमटत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारपेठेत वावरताना व्यापाऱ्यांसह नागरिकांनीदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.
साधारणत: मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाली. सुरूवातीच्या काळात जवळपास दीड महिना अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने, व्यवसाय ठप्प होते. जून महिन्यापासून ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली तसेच रेस्टॉरन्ट, हॉटेल, खासगी प्रवाशी वाहतूकही सुरू झाली.
सर्वच शहरांमधील बाजारपेठेत विविध वस्तू, साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याच्या सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे.
खासगी प्रवासी वाहतूक सुसाट
२२ मार्चपासून ठप्प असलेली खासगी प्रवासी वाहतूक २ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यामुळे खासगी वाहनधारकांना दिलासा मिळाला असून, चालक, वाहक व कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला. ग्रामीण भागातही खासगी प्रवाशी वाहतूक सुसाट असून, प्रवाशांनाही वाहनाची सुविधा उपलब्ध झाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव; प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक
‘अनलॉक-४’च्या टप्प्यात एकिकडे अर्थव्यवस्थेला उभारी मिळत आहे तर दुसरीकडे याच काळात सहा दिवसात नव्याने ४०९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणेही आवश्यक ठरत आहे. अन्यथा परिस्थिती चिंताजनक बनण्यास फारसा वेळ लागणार नाही.
‘अनलॉक-४’च्या टप्प्यात बºयाच अंशी शिथिलता मिळाली. दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढली. ग्राहकांची गर्दी पाहता, अर्थचक्राला उभारी मिळत आहे. दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंताही कायम आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
- मनिष मंत्री,
जिल्हा सचिव, व्यापारी मंडळ वाशिम