जिल्ह्यात उद्यापासून अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:07+5:302021-06-06T04:30:07+5:30

वाशिम : कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार राज्य शासनाने उद्या, सोमवारपासून राज्यात पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार ...

Unlocked in the district from tomorrow | जिल्ह्यात उद्यापासून अनलॉक

जिल्ह्यात उद्यापासून अनलॉक

Next

वाशिम : कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार राज्य शासनाने उद्या, सोमवारपासून राज्यात पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश असून, शासन नियमानुसार अनलॉकचे सुधारित नियम उद्या, सोमवारपासून लागू होणार आहेत.

दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. गत सहा दिवसांपासून तर दोन अंकी संख्येत कोरोना रुग्ण येत असून, कोविड केअर सेंटरही ओस पडत असल्याचे आशादायी चित्र आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने १ जूनपासून जिल्ह्यात निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात उद्या, सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून पाचस्तरीय अनलॉक करण्यात येणार आहे, अशी घोषणा गुरुवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर राज्य शासनातर्फे करण्यात आली. अनलॉक करण्यासाठी जे पाच टप्पे ठरविण्यात आले आहेत, त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपला जिल्हा कोणत्या स्तरात बसतो, हे पाहून आदेश काढावेत, असे शासन परिपत्रकात नमूद आहे. मात्र, सुधारित नियम सोमवारपासूनच लागू होतील. कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्या यानुसार हे स्तर ठरविण्यात आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २.१ टक्के, तर आठ टक्के रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात असून, शासन नियमानुसार अनलॉकच्या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी उद्या, सोमवारपासून केली जाणार आहे. अनलॉकमध्ये नागरिकांनी अधिक बेसावध न राहता स्वयंशिस्त पाळून कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक ठरत आहे.

०००००००००००

१) शासनाने कुठले पाच स्तर ठरविले आहेत? (बॉक्स)

१) पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या स्तरात येईल.

२) पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात येईल.

३) पॉझिटिव्हिटी रेट पाच ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात येईल.

४) पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग चौथ्या स्तरात येईल.

५) पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पाचव्या स्तरात येईल.

०००००००००००००००००००००

काय सुरू राहील?

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते २ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील.

- हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत खुली राहतील.

- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरू राहतील.

- खासगी आणि सरकारी कार्यालयांत ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील.

- सिनेमा चित्रीकरणाला स्टुडिओमध्ये परवानगी असेल.

- सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला ५० टक्के क्षमतेने दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील. (सोमवार ते शुक्रवार).

- लग्नसोहळ्यास ५० जणांची उपस्थिती. अंत्यसंस्कार २० जणांची उपस्थिती. इतर बैठका ५० टक्के उपस्थिती राहील.

- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी राहील

0000

- इंडोर खेळामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहणार आहेत. दुपारी दोन वाजल्यानंतर हॉटेल्स बंद राहणार असून, त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील. शनिवारी आणि रविवारी हॉटेलही बंद राहतील.

- खासगी शिकवणी वर्गातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने खासगी शिकवणी वर्गही बंदच ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.

००००००

कोट बॉक्स

शासनाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अनलॉकच्या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- शैलेश हिंगे

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

००००

कोरोनाचे एकूण रुग्ण - ४०४३९

बरे झालेले रुग्ण - ३८४८६

एकूण मृत्यू - ५८९

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १३६३

सध्या ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण - ११०

सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट - २.१

Web Title: Unlocked in the district from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.