अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गीक कृत्य : आरोपी युवकास १० वर्षाचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:42 PM2019-12-25T13:42:57+5:302019-12-25T13:43:02+5:30
आरोपी शंकर दिलीप धबडघाव या २० वर्षीय युवकास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तहेरा यांनी मंगळवारी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गीक कृत्य केल्याप्रकरणी दोषी आढळुन आलेल्या मालेगाव येथील आरोपी शंकर दिलीप धबडघाव या २० वर्षीय युवकास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. रचना तहेरा यांनी मंगळवारी सुनावली.
मालेगाव येथील मुंगसाजी परिसरात राहणाऱ्या पिडीत अल्पवयीन मुलाच्या आजीने सदर घटनेची फिर्याद दिली होती. आपल्या अल्पवयीन नातवास आरोपी शंकर धबडघाव याने २५ मे २०१८ रोजी दुपारी २ वाजता आपल्या अल्पवयीन नातवास चल आपण बाहेर जावू असे सांगुन लगतच्या मंदिराजवळील झोपडीत नेवुन त्याच्यासोबत अनैसर्गीक कृत्य केले व याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घरी आल्यावर सदर घटनेची माहिती नातवाने दिली, असे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शंकर याचे विरुध्द कलम ३७७ ,५०४, ५०६, भादंवी तसेच पोक्सो अंतर्गत कलम ४, ५ एम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक कमलेश खंडारे यांनी तपास पूर्ण करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. विद्यमान न्यायालयाने या प्रकरणात एकुण सहा साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. तहेरा यांनी आरोपी शंकर धबडघाव यास कलम ३७७ अंतर्गत १० वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास पुन्हा एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच कलम ४ पोक्सो अंतर्गत ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास पुन्हा एक महिने सश्रम कारावास तर पोक्सो कलम ६ मध्ये १० वर्ष सश्रम कारावासाची व २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास पुन्हा एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. सदर तिन्ही शिक्षा आरोपीस एकत्रीतरित्या भोगावयाचे आहे असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी सहाय्यक अभियोक्ता अॅड. माधुरी मिसर यांनी बाजु मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणुन केशव इरतकर यांनी सहकार्य केले.