अवकाळी, गारपिटीचा ६०० हेक्टरवरील पिकांना फटका!
By संतोष वानखडे | Published: April 26, 2023 03:59 PM2023-04-26T15:59:56+5:302023-04-26T16:00:24+5:30
दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने कडक उन्हाचे मानले जातात.
वाशिम : उन्हाळ्यातही जिल्ह्यात गारपिट, वादळवारा व अवकाळी पाऊस बरसत असल्याने फळबागांसह भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मंगळवारच्या (दि.२५)अवकाळी पावसामुळे ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, बुधवारी (दि.२६) महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्याला सुरूवातही झाली.
दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने कडक उन्हाचे मानले जातात. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच अवकाळी पाऊस, वादळवारा आणि गारपिट असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मार्च महिन्यात १४ ते २० आणि ३१ तारखेला अवकाळी पाऊस, गारपिट झाल्याने कांदा, हळद यांसह फळबाग व भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर ६ व ८ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास ८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.
आता पुन्हा २५ एप्रिल रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने कांदा, हळद, भाजीपाला व फळबागेचे नुकसान झाले. जवळपास ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यामध्ये वाढही होऊ शकते, असेही सांगण्यात आले. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात असून, अंतिम अहवालानंतर नेमके किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले? याचा आकडा समोर येईल.