अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा, नुकसानाचे क्षेत्र वाढणार
By दिनेश पठाडे | Published: November 27, 2023 09:46 PM2023-11-27T21:46:50+5:302023-11-27T21:46:58+5:30
एका व्यक्तीचा मृत्यू; ९० मेंढ्यांही दगावल्या
वाशिम : जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या अवकाळीचा ४६२ हेक्टरवरील कपाशीला तडाखा बसला असून कपाशी जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. दरम्यान, वस्तूनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर नुकसानाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
रविवारच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानाचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने २७ नोव्हेंबरला दिले होते. त्यानुसार तातडीने जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ५०.५ मीमी पावसाची नोंद झाली असून काही मंडळात अतिवृष्टी तर इतर मंडळात अवकाळी पाऊस बरसला. वाशिम तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार ४५२ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. तर एका घराची अंशत: पडझड झाली. त्याचप्रमाणे प्रकाशराव त्र्यंबकराव सरनाईक(रा. देऊळगाव बंडा, ता.रिसोड) यांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण समजू शकले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तसेच मंगरुळपीर तहसील कार्यालयांतर्गत ४१, कारंजा ३५, मानोरा १४ अशा ९० मेंढ्यांचा तर जिल्ह्यात एका मोठ्या जनावराचा मृत्यू झाल्याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनास सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला त्यानुसार हा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला. मेंढ्याच्या मृत्यूंची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
नुकसानाचे क्षेत्र वाढणार
जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल सादर केला असला तरी प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेल्या मंडळासह इतर भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची स्थिती आहे. सोमवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे पंचनामे व इतर कामे करण्यास अडचण निर्माण झाली. मात्र, पुढील काही दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एकूण सर्व तालुक्यांतील नुकसानाची स्थिती समोर येणार आहे. तेव्हाच नेमकी कोणत्या तालुक्यात कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.