विहित मुदतीत बिंदु नामावली अद्ययावत करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:56 PM2018-12-18T12:56:50+5:302018-12-18T12:57:01+5:30
शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांसह इतर पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. य निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांसह इतर पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत केली जात आहे. जिल्ह्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी विहित मुदतीत बिंदु नामावली अद्ययावत करून २१ जानेवारीपर्यंत पवित्र प्रणालीवर भरावी, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांनी शिक्षण संस्था चालकांना दिल्या. स्थानिक शिवाजी विद्यालयात आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते.
यावेळी शिक्षण संस्था चालक संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर, शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे उपाध्यक्ष अरूणराव सरनाईक यांच्यासह शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, प्राचार्यांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षणाधिकारी नरळे यांनी राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांसह इतर पदभरतीसाठी बिंदु नामावलीची तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. १६ टक्के आरक्षणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्याची माहिती दिली. शैक्षणिक संस्थांना २० डिसेंबर २०१८ पर्यंत बिंदु नामावली अद्ययावत करावी लागणार आहे. त्यानंतर मागासवर्ग कक्षाकडून २९ डिसेंबरपर्यंत तपासणी करून बिंदु नामावली अद्ययावत करणे आणि त्यानंतर शैक्षणिक संस्थांना २० जानेवारी २०१९ पर्यंत पवित्र प्रणालीवर बिंदु नामावलीची माहिती भरावी लागणार आहे, असे नरळे यांनी सांगितले. याबरोबरच आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंमलबजावणीसंदर्भात माहिती देण्यात आली. शाळांमध्ये भौतिक सुविधा पूर्ण करणे, शैक्षणिक गुणवत्तेसाठी कार्यक्रम राबविणे, शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी, सुरक्षिता, स्वच्छता आदी विषयांची माहिती संस्थाचालकांना देण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष, सचिव, प्राचार्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.