जिल्ह्यात उडीद, मुगाच्या क्षेत्रात घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:29 AM2021-06-25T04:29:07+5:302021-06-25T04:29:07+5:30
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख ६ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यासाठी ...
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख ६ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यासाठी बियाणे आणि खतांची मुबलक प्रमाणात उपलब्धताही करण्यात आली. जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून दमदार पाऊस पडू लागल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. त्यामुळेच २४ जूनपर्यंतच जिल्ह्यात ३ लाख १८ हजार ९२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकली असून, हे प्रमाण नियोजित क्षेत्राच्या ७८.५४ टक्के आहे. त्यात यंदा तूर वगळता कडधान्याचा पेरा घटला आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र ५४ हजार ५०९ हेक्टर असताना ४५ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे, तर उडीद आणि मुगाचे क्षेत्र यंदा घटल्याचे दिसत आहे. उडिदाचे सरासरी क्षेत्र १० हजार १८० हेक्टर अपेक्षित असताना केवळ ३ हजार ८३७ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली. हे प्रमाण ३७.६९ टक्के आहे, तर मुगाचे सरासरी क्षेत्र ८ हजार २७२ हेक्टर असताना केवळ २ हजार ६८२ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली असून, हे प्रमाण ३२.४२ टक्के आहे. आता या दोन्ही पिकाच्या पेरणीचा कालावधी जवळपास निघून गेला आहे. त्यामुळे या पिकांचे फारसे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही.
---------------
बियाण्याच्या तुटवड्यानंतरही सोयाबीनवरच भर
गतवर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीन बियाण्यांवर परिणाम झाला आणि उगवणशक्ती खालावल्याने बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे यंदा या पिकाचे क्षेत्र घटण्याची भीती होती. तथापि, यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच भर दिला असून, या पिकाचे सरासरी क्षेत्र ३ लाख १५ हजार हेक्टर असताना सद्यस्थितीतच २ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली असून, यात आणखी मोठी वाढ होण्याचा विश्वास आहे.
-------------
तूर, कपाशीलाही शेतकऱ्यांची पसंती
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीननंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तुरीलाच पसंती दिली असून, तुरीचे सरासरी क्षेत्र ५४ हजार ७०९ हेक्टर अपेक्षित असताना ४५ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणीही झाली आहे. त्याशिवाय कपाशीलाही शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली असून, १९ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी अपेक्षित असताना १७ हजार हेक्टरवर पेरणीही झाली आहे. यात आणखी वाढ होणार आहे.
---------
खरिपातील गळित पिके हद्दपार
गत काही वर्षांपासून खरीप हंगामात सोयाबीन या तेलवान पिकावरच शेतकरी सर्वाधिक भर देत आहेत. त्यामुळे या हंगामातील गळित पिके आता हद्दपार होत असून, यंदाही अत्यंत नगण्य क्षेत्रावर तिळाची पेरणी झाली आहे, तर भुईमूग, सूर्यफूल, कराळ ही खरिपातील गळित पिके आता नामशेष झाली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसत आहे.
-------------------------
जिल्ह्यात प्रमुख पिकांच्या पेरणीचे क्षेत्र ( २४ जून)
१) कडधान्य पिकांचे क्षेत्र
पीक नियोजित क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
सोयाबीन -३००४१७ - २४९३८९
तूर -५४५०९ -४५२६४
कपाशी -१९२४५ -१७००१
मूग -८२७२ -२६८२
उडीद -१०१७९ - ३८३७
इतर -१६३८ - ११७
----------------------------