वृक्ष वाचविण्यासाठी संक्रातिच्या सुगड्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:44 PM2019-01-19T13:44:46+5:302019-01-19T13:45:24+5:30
वाशीम: सुगड्यांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम: मकरसंक्रात व सुगडी यांचे अतूट नाते आहे . मकर संक्रातीला सुवासिनींना सुगड्यांचे वाण देऊन हा सण साजरा केला जातो . पूर्वी ह्या सुगड्यांचा वापर पुढे उन्हाळ्यात पाणी पाण्यासाठी केला जायचा .परंतु आजच्या आधुनिक व यंत्र युगात घरोघरी फ्रिज ,रेफ्रिजेटरचा वापर वाढल्यामुळे हे सुगडे दुर्लक्षित झाले आहे . परंतु याच सुगड्यांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात येत आहे. तसेच याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे.
या अभिनव संकल्पनेतुन सुगड्यांना झाडांच्या बुंध्यापाशी एका फुटावर खड्डा करून त्यात सुगडे ठेवल्यास व त्याला एक छिद्र पाडून त्यात कापसाची किंवा कपड्याची वात लावली की सुगड्यात भरलेली पाणी वृक्षांना सलाईन सारखे काम करते . सुगडयातील भरलेले पाणी जवळपास झाडांना दोन ते तीन दिवस सहज पुरते . आपण झाडांना पाईपद्वारे किंवा हाताने पाणी दिल्यास त्याचे जवळपास नव्वद टक्के बाष्पीभवन होते , परंतु या पद्धतीचा अवलंब केल्यास हे पाणी हळूहळू झिरपत जाउन झाडांच्या मुळांना उपयोगी पडते . वरील उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेऊन वृक्ष संवर्धन करण्यासाठी व शेतीसाठी उपयोग करावा असे आवाहन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व राष्ट्रीय हरीत सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे.