कारवाईनंतर छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर
By admin | Published: June 16, 2017 01:40 AM2017-06-16T01:40:38+5:302017-06-16T01:40:38+5:30
वाशिम येथील प्रकार : नगर परिषदेची मोहीम व्यर्थ
स्टिंग आॅपरेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग वापरण्यावर बंदी आहे. या संदर्भात वाशिम नगर परिषदेच्यावतीने कारवाई मोहीम हाती घेऊन अनेक व्यापाऱ्यांवर कारवाई केली होती. कारवाईचा धसका घेत काही दिवस शहरातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार झाल्या होत्या; परंतु कारवाईनंतर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने आता छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे ‘लोकमत’ने १५ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरून उघडकीस आले आहे.
विविध प्रतिष्ठानांमध्ये व्यावसायिक प्लास्टिक बॅगचा सर्रास वापर करीत असल्याने नाल्यांमध्ये प्लास्टिक बॅग अडकण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. निसर्गाचा समतोल राखायचा असल्यास प्लास्टिक निर्मूलन आवश्यक आहे. यासाठी जनजागृती केली जात असली, तरी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे झाले आहे. यापूर्वी जिल्ह्यात कॅरीबॅग बंदीची मोहीम राबवून शहरात विविध व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक बॅगमुळे काय दुष्परिणाम होतात, यासंदर्भात पथनाट्य, कविता, गीतातून जनजागृती करण्यात आली. ही कारवाई थंड झाल्याबरोबर बिनधास्तपणे वापर होत नसला, तरी ग्राहकांनी प्लास्टिक पिशव्यांची मागणी केल्यावर तो परत जाऊ नये म्हणून त्याला पिशवी दिल्या जात आहे.
१५ जून रोजी शहरातील काही दुकाने, भाजी मार्केट व फेरीवाल्यांच्या बाजूला उभे राहून येणाऱ्या ग्राहकांनी प्लास्टिक पिशवी लपून ठेवलेल्या ठिकाणाहून काढून देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी व जनावरांसाठी प्लास्टिक पिशव्या घातक असल्याने त्याचा वापर टाळावा, असे आवाहनही नगर परिषद आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
आरोग्यास घातक असलेल्या पिशव्यांचा वापर होत असल्याचे आज उघडकीस आले आहे. याबाबत नगर परिषदेने पुढाकार घेऊन पुन्हा कारवाई मोहीम हाती घेणे गरजेचे झाले आहे.