वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:38+5:302021-02-21T05:18:38+5:30
जिल्ह्यातील औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे जवळपास ६० कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. थकीत देयकाचा भरणा करण्याच्या ...
जिल्ह्यातील औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे जवळपास ६० कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. थकीत देयकाचा भरणा करण्याच्या सूचना महावितरणतर्फे वारंवार ग्राहकांना देण्यात आल्या. दरम्यान, कोरोनाकाळातील थकीत देयक माफ किंवा कमी होण्याच्या चर्चेमुळे ग्रामीण भागात अनेकांनी देयकाचा भरणा केला नाही. त्यामुळे थकीत देयकाचा आकडा चांगलाच फुगला आहे. थकीत वीज देयक वसूल करण्यासाठी महावितरणने सर्वत्र मोहीम हाती घेतली असून, वारंवार सूचना करूनही देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी लाईनमनऐवजी खासगी व्यक्तींना हाताशी धरून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे चित्र आहे. यापूर्वीही विद्युत बिघाड दुरुस्त करण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर केला जात असल्याचे समोर आले होते. यामध्ये कारंजा तालुक्यात एका जणाला जीवही गमवाला लागला होता. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याकरिता खासगी व्यक्तींचा वापर करणाऱ्यांविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
बॉक्स
९४७ जणांचा वीजपुरवठा खंडीत
जिल्ह्यात घरगुती वीज वापर करणाऱ्या ७२ हजार २०० ग्राहकांकडे ४६ कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. यांसह १६७२ औद्योगिक ग्राहकांकडे ७ कोटी ९६ लाख आणि ५ हजार ७२० वाणिज्यिक ग्राहकांकडे ८ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. थकीत देयकाचा भरणा न करणाऱ्या जवळपास ९४७ जणांचा वीजपुरवठा आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे.
दिली.
०००
कोट बॉक्स
थकीत वीज देयके वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. थकीत देयकाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. लाईनमन किंवा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीच वीजपुरवठा खंडित करणे अनिवार्य आहे. खासगी इसम हा वीजपुरवठा खंडित करीत असेल तर ही बाब गंभीर असून, याप्रकरणी चौकशी केली जाईल तसेच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खासगी व्यक्तींचा कुणीही वापर करू नये, अशा सूचना दिल्या जातील.
- आर.जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.
००००