पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या निरूपयोगी साहित्याचा पुनर्प्रक्रियेसाठी वापर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 03:40 PM2019-06-02T15:40:54+5:302019-06-02T15:40:59+5:30
निरूपयोगी साहित्य इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्थांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १ जून रोजी दिले आहेत.
वाशिम : पाणीपुरवठा योजना राबविताना वापरण्यात येणाºया विविध एचडीपीई, पीव्हीसी जलवाहिन्यांचे वापरात न येणारे लहान तुकडे, तुटके भाग तसेच पाईप्स् जोडताना तयार होणारा कचरा त्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात राहत असल्याने पर्यावरणविषयक समस्या निर्माण होत असल्याच्या निष्कर्षाप्रत पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आला आहे. या पृष्ठभूमीवर सदर निरूपयोगी साहित्य इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्थांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १ जून रोजी दिले आहेत.
राज्यात पाणी पुरवठ्याच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येतात. सदर योजना राबविताना वापरण्यात येणाºया विविध एचडीपीई, पीव्हीसी जलवाहिन्यांचे वापरात न येणारे लहान तुकडे, तुटके भाग तसेच एचडीपीई, पीव्हीसी पाईप्स् जोडताना तयार होणारा कचरा त्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात सोडला जातो. सदर साहित्य निरुपयोगी असले तरी हा अविघटनशील स्वरुपाचा कचरा पडून राहिल्याने पर्यावरणविषयक समस्या निर्माण होतात. सदर समस्या टाळण्यासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात येणाºया एचडीपीई, पीव्हीसी जलवाहिन्यांचे शिल्लक तुकडे, तुटके भाग आदि साहित्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सूचना देण्याची दक्षता जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत. जलवाहिन्यांचे वापरायोग्य नसणारे तुकडे, तुटके भाग आदी साहित्य कामाच्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित उप अभियंता, शाखा अभियंता यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी हा एचडीपीई, पीव्हीसी कचरा गोळा करून इतरत्र टाकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी पुनर्वापर करणाºया कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींकडे पाठवावा, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत.
पाणीपुरवठा योजनांचे काम करताना निरुपयोगी साहित्य त्या ठिकाणी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाते. यापुढेही दक्षता घेण्यात येईल तसेच संबंधित अभियंता, कंत्राटदारांना सूचना दिल्या जातील. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल.
-नीलेश राठोड
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
जिल्हा परिषद वाशिम