वाशिम जिल्ह्यात ८७ टक्के बालकांचे रुबेला लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:06 PM2019-01-23T16:06:15+5:302019-01-23T16:06:30+5:30
वाशिम : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८७ टक्के बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८७ टक्के बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गोवर, रुबेलापासून बालकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ झालेल्या या मोहिमेत जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील तीन लाख ११ हजार बालकांना ही गोवर, रुबेला लस देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ११७६ अंगणवाडी केंद्र आणि १३६५ शाळांमधील बालकांचे लसीकरण करणे अपेक्षीत असून, २२ जानेवारीपर्यंत २ लाख ७६ हजार बालकांना ही लस देण्यात आली आहे. गोवर या आजारामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती झपाट्याने कमी होते, त्यामुळे मुलांच्या शरीरात व्हिटॅमीन ए ची कमतरता जाणवते, अशी बालके आंधळी होण्याच्या धोका संभावतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे डायरीया, न्युमोनीया, कुपोषण आदी आजार होण्याची शक्यता जास्त असते. संभाव्य आजारापासून या वयोगटातील बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोवर, रुबेला लस महत्त्वपूर्ण असून, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला ही लस द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले. ज्या शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये ८० टक्के पेक्षा कमी लसीकरण झाले आहे, अशा अंगणवाडी केंद्र, शाळांमध्ये ही मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.