४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:33+5:302021-04-02T04:43:33+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या आदेशावरून वाशिम येथील ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पत्रकार ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या आदेशावरून वाशिम येथील ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या पत्रकार वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. लक्ष्मीकांत राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राठोड म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी नजीकच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी. जिल्ह्यात ८८ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय यासह काही आरोग्य उपकेंद्रांचा व खाजगी लसीकरण केंद्रांचाही समावेश आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी, असे ते म्हणाले.