ऐन पावसाळ्यात थांबले जनावरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:42+5:302021-06-27T04:26:42+5:30
यासंदर्भात माहिती देताना पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागवत महाले यांनी सांगितले की, संघटनेने ११ मागण्यांचे निवेदन पशुसंवर्धन आयुक्तांकडे सादर ...
यासंदर्भात माहिती देताना पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागवत महाले यांनी सांगितले की, संघटनेने ११ मागण्यांचे निवेदन पशुसंवर्धन आयुक्तांकडे सादर केले होते. त्यावर चर्चेसाठी पशुसंवर्धन आयुक्तांकडून निमंत्रण मिळणे अपेक्षित होते; मात्र आयुक्तांनी दखल घेतली नाही. अखेर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ जूनरोजी आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळीदेखील ११ पैकी दोन मागण्यांवर अर्धवट चर्चा करून बैठक संपविण्यात आली. त्यामुळे कुठलाही प्रभावी तोडगा निघाला नाही. मागण्यांची दखल न घेतल्याने संघटनेने १५ जूनपासून विविध टप्प्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार १५ जूनपासून वाशिम जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वप्रकारचे ऑनलाईन, मासिक तसेच वार्षिक अहवाल देणे बंद केले आहे. आढावा बैठकांना संवर्गातील सदस्य अनुपस्थित राहत आहेत. तसेच जनावरांचे लसीकरणही थांबविण्यात आले.
आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात १६ जूनरोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. त्याऊपरही तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून पूर्णत: कामबंद पुकारण्यात येईल, असे भागवत महाले यांनी सांगितले.
..........................
जनावरांना घटसर्प, फऱ्या आजार जडण्याचे संकेत
जिल्हाभरातील पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून आंदोलन पुकारले. तेव्हापासून जनावरांचे लसीकरणही थांबविण्यात आले आहे. परिणामी, जनावरांना विशेषत: पावसाळ्यात घटसर्प, फऱ्या यासारखे जीवघेणे आजार जडण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहे.