लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:48 PM2021-02-13T12:48:57+5:302021-02-13T12:49:16+5:30
Vaccination of children शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निरोगी आयुष्य जगता यावे, विविध प्रकारच्या आजारांपासून, विषाणूंपासून संरक्षण व्हावे, यासाठी मूल जन्माला आल्यापासून त्याचे वय १६ वर्षे होईपर्यंत टप्प्याटप्प्याने लसीकरण करावे लागते. कोरोना संकटामुळे मात्र २०२० या वर्षांत खासगी दवाखान्यांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले आहे. शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
मूल जन्माला आल्यानंतर लगेच क्षयरोग प्रतिबंधक (बी.सी.जी.) लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचली जाते. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. बाळ दीड महिन्याचे झाल्यानंतर त्रिगुणी (ट्रिपल) लस टोचली जाते. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. या लसीसोबतच बाळास पोलिओ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस द्यावा लागतो. गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार असून, त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस मूल ९ ते १२ महिन्यांचे असताना टोचली जाते. ६ महिने ते ३ वर्षे या वयात ‘अ’ जीवनसत्वाचा अभाव असतो. त्यामुळे या काळात ‘अ’ जीवनसत्वाचे डोस बाळाला पाजले जातात. त्याच्या दैनंदिन आहारात पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्याही असाव्या लागतात.
दरम्यान, वयाच्या ठरवून दिलेल्या टप्प्यांवर लसीकरण करणे आवश्यक असते; अन्यथा मूल निरनिराळ्या आजारांना बळी पडू शकण्याचा धोका असतो. असे असताना कोरोनाच्या संकटकाळात जन्मलेल्या व खासगी दवाखान्यांवर विसंबून राहणाऱ्या अनेक पालकांनी मुलांचे लसीकरण करून घेतलेले नाही. जिल्ह्यात हे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास आहे. शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
२०१९ मध्ये लसीकरण पूर्ण
२०१९ या वर्षांत जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा लहान मुलांना सर्व प्रकारच्या लसी देण्यात आल्या होत्या. काेराेनामुळे २०२० मध्ये मात्र ते कमी झाल्याचे दिसून येत आहे.
मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहावी, यासाठी त्यांना जन्मापासून १६ वर्षे वयापर्यंत निरनिराळ्या प्रकारे लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना काळात मुलांचे लसीकरण केले नाही, त्यांनी करून घ्यावे.
- डॉ. राम बाजड, बालरोग तज्ज्ञ
मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली नसल्यास त्यांना विविध स्वरूपातील आजार होऊ शकतात. त्यापासून संरक्षण होण्यासाठी ठरवून दिलेले लसीकरण अत्यावश्यक आहे.
- डॉ. हरीश बाहेती, बालरोग तज्ज्ञ.