वाजंत्री, मंडप डेकोरेशन व्यावसाियक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:50+5:302021-05-23T04:40:50+5:30
मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या स्वरूपाचे विवाह सोहळे व कार्यक्रमावर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे. ...
मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या स्वरूपाचे विवाह सोहळे व कार्यक्रमावर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे. मोठी गुंतवणूक करून वाजंत्री व्यावसायिकांनी व्यवसायासाठी साहित्य विकत घेतले. त्याप्रमाणे मंडप डेकोरेशनवाल्यांनी ही मोठा खर्च करून व्यवसायाय उभारला आहे. मात्र, कोरोनामुळे मोठ्या स्वरूपाचे विवाह सोहळे व इतर कार्यक्रमावर शासनाने बंदी घातली. त्यामुळे मार्च २०२० पासून सद्य:स्थितीपर्यंत वाजंत्री व मंडप डेकोरेशन व्यवसाय बंदच आहे. मध्यंतरी केवळ दोन महिने सूट मिळाली होती; पण त्यावेळी लग्नसराईचा हंगाम नव्हता. काही वाजंत्री व्यावसायिकांनी जवळची सर्व मायपुंजी खर्च करून व कर्ज काढून व्यवसायासाठी आवश्यक असलेले वाहन व साधनसामग्रीसुद्धा खरेदी केली. मात्र, पंधरा महिन्यांपासून कोरोनामुळे व्यवसायावर बंदी आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन कर्जाचा डोंगर वाढला आहे. अशीच परिस्थिती मंडप डेकोरेशन व्यावसायिकांची सुद्धा झाली आहे. या दोन्ही व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी, असा सूर व्यावसायिकांमधून उमटत आहे.
०००
लग्नसराईमध्ये जीवतोड मेहनत करून आम्ही वाजंत्री व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. जवळपास १५ महिन्यांपासून कोरोना संसर्गमुळे आमच्या व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच आमच्यावर कर्जाचा डोंगरसुद्धा वाढत आहे. सरकारने आम्हाला आर्थिक मदत द्यावी.
-सुभाष कांबळे,
वाजंत्री व्यावसायिक, शिरपूर जैन.