विविध मागण्यांसाठी धोपे कुटुंबियांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:50 PM2019-02-04T17:50:01+5:302019-02-04T17:50:43+5:30
सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजा येथील रहिवासी तथा मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत सुनील विठ्ठलराव धोपे (३७) हे १५ सप्टेंबर २०१८ रोजी कर्तव्यावर असताना सकाळच्या दरम्यान संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कारवाई व्हावी, सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सुनील धोपे यांचे पार्थिव १७ सप्टेंबर २०१८ रोजी कारंजात आणले होते. धोपे यांची हत्या झाल्याचा आरोप करून धोपे कुटुंबीयांनी त्यास कारणीभूत असणाºया सीमा सुरक्षा दलातील पाच अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्या लावून धरल्या होत्या. अन्यायाच्या विरोधात १८ ते २१ सप्टेंबर २०१८ पर्यंत कारंजा बंदची हाकही दिली होती. याप्रकरणी कारंजा पोलिसांत ‘झीरो एफआयआर’अंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या संबंधित पाच अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण सिलाँग पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग केले होते. तेव्हापासून आतापर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध कोणतीही ठोस कार्यवाही नसल्याचा आरोप करीत मृतक सुनील धोपे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई धोपे, पत्नी सविता धोपे यांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. याप्रकरणी सीबीआय किंवा चौकशी पथक नियुक्ती करून निष्पक्ष चौकशी करावी, दोषींना शिक्षा करण्यात यावी, कारवाई करण्यास विलंब का झाला याकरिता योग्य ती माहिती देण्यात यावी, दोषी अधिकारी व कर्मचारी मोठया पदावर असल्यामुळे अद्याप त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, परत शवविच्छेदन करण्याची धोपे कुटुंबियांची मागणी फेटाळण्यात का आली, सुनील यांना शहीद जवानाचा दर्जा देण्यात यावा, धोपे कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, कारंजा लाड येथे जागा देवून मृतक सुनील यांचा पुतळा उभारण्यात यावा आदी मागण्या यावेळी धोपे कुटुंबियांनी केल्या. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी लक्ष्मीबाई धोपे, सविता धोपे, सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव, आरटीआय कार्यकर्ते विनोद जाधव आदींनी केली.