वरली मटका, जुगारावर वाशिम पोलिसांचे छापे
By admin | Published: July 11, 2017 01:54 AM2017-07-11T01:54:17+5:302017-07-11T01:54:17+5:30
पाच जणांवर गुन्हे: विविध साहित्यासह दोन हजारांवर ऐवज जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरातील महात्मा फुले भाजीबाजारात सुरू असलेल्या अवैध वरली-मटक्यासह शहरातील जि.प. शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या जुगारावर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने १० जुलै छापे मारून पाच जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई केली.
वाशिम शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथक १० जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून महात्मा फुले भाजी मार्केट वाशिमजवळील पार्किंगमध्ये एक इसम लोकांकडून वरली-मटक्याचे आकडे घेऊन पैशावर हारजीतचा सट्टापट्टीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता मोसीन खान युनुस खान (२७) रा. वर्ष बिलाल नगर वाशिम हा वरली मटका चालवित असल्याचे दिसते.
पोलिसांनी त्याच्याकडून वरली मटक्याचे साहित्य व नगदी ६७० रुपये मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच दुसऱ्या कारवाईत काही इसम जुनी जिल्हा परिषद शाळा वाशिमच्या परिसरात ५२ ताशपत्यावर पैशाची हार-जीतचा खेळ खेळत आहे, अशी माहिती मिळाल्यावरून डीबी पथकाने छापा टाकला असता प्रल्हाद रामजी राऊत रा. चामुंडादेवीजवळ वाशिम, विजय कोंडुजी वैद्य रा. तामशी, गोपाल ज्ञानेश्वर कदम रा. टिळक चौक वाशीम, अनिल विठ्ठल सुरवसे रा. गवळीपुरा वाशिम, यांच्यावर जुगार रेड करून नगदी १,३०० रुपये जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय शिपणे, नापोका प्रशांत अंभोरे, राजेश बायस्कर, ज्ञानदेव म्हात्रे, गजानन कऱ्हाळे यांच्या पथकाने केल्या.