पोलिस भरती प्रक्रियेवर 'एसीबी'चा वॉच! पैशाची मागणी महागात पडणार
By संतोष वानखडे | Published: June 20, 2024 07:36 PM2024-06-20T19:36:46+5:302024-06-20T19:36:57+5:30
नोकरीच्या नावाखाली पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क झाला आहे.
वाशिम : राज्यातील पोलिस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, नोकरीच्या नावाखाली पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी ) सतर्क झाला आहे.
राज्यातील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बँडस्मन, सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती- २०२३ करीता देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक व निःपक्षपाती होण्याकरिता मैदानावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक उमेदवारांची व्हीडीओ शुटींग तसेच उमेदवारांची ओळख आधार व्हेरिफिकेशन व्दारे देखील घेण्यात येणार आहे. असे असले तरी काही लोकसेवक किंवा त्यांचे खासगी पंटर हे पोलिसाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून पैशाची मागणी करू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक होऊ नये तसेच पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क झाला आहे.
पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान लोकसेवकाने अथवा त्यांच्यावतीने कोणत्याही अन्य व्यक्तिने पोलिस भरतीसंदर्भात आमिष, प्रलोभन देवून पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबी अमरावती परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप यांनी केले.
तक्रार कोठे करावी ?
पोलिस भरती संदर्भात नोकरीचे आमिष देवून कोणी पैशाची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. याशिवाय संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करता येणार आहे.
वाशिम जिल्ह्यात ६८ जागांसाठी ४२७९ अर्ज !
वाशिम पोलिस दलातील ६८ जागांसाठी ४ हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये पुरुष ३७६० आणि ५१९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
लोकसेवक अथवा त्यांच्यावतीने अन्य व्यक्तिने पोलिस भरती संबंधाने प्रलोभन अथवा आमिष देवून पैशाची किंवा इतर काही मोबदल्याची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे किंवा टोल फ्री क्रमांकावर निसंकोच संपर्क साधावा - गजानन शेळके, पोलीस उपअधीक्षक एसीबी वाशिम