Vashim: कारंजा शहरात पाऊस मनसोक्त बरसला; पाण्यात टाक्याही वाहून गेल्या...
By संतोष वानखडे | Published: June 23, 2024 07:47 PM2024-06-23T19:47:05+5:302024-06-23T19:47:50+5:30
Vashim News: गत पाच, सहा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कारंजा शहर परिसरात मनसोक्त बरसला. या पावसाच्या पाण्यात शहरातील के.एन. काॅलेज परिसरात पाण्याच्या टाक्या वाहून गेल्याचे चित्र दिसून आले.
- संतोष वानखडे
वाशिम - गत पाच, सहा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कारंजा शहर परिसरात मनसोक्त बरसला. या पावसाच्या पाण्यात शहरातील के.एन. काॅलेज परिसरात पाण्याच्या टाक्या वाहून गेल्याचे चित्र दिसून आले.
यंदाच्या पावसाळ्यात २२ जूनपर्यंत कारंजा शहर परिसरात दमदार पाऊस झाला नव्हता. २२ जूनपर्यंत कारंजा तालुक्यात पावसाची सरासरी तूट ४१ टक्के होती. दमदार पाऊस नसल्याने कारंजा तालुक्यात जवळपास ९५ टक्के पेरण्या खोळंबल्याचे पेरणी अहवालावरून दिसून येते. दरम्यान, २३ जून रोजी सायंकाळनंतर कारंजा शहर परिसरात व तालुक्यातील काही भागात मनसोक्त पाऊस बरसला. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. के.एन. काॅलेज परिसरात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहले असून, त्यामध्ये पाण्याच्या टाक्याही वाहून जात असल्याचे चित्र दिसून आले. या घटनेचे अनेकांनी चित्रिकरण केले असून, त्याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. धो-धो पाऊस बरसल्याने शेतकरी सुखावला असून, आता पेरणीला खऱ्या अर्थाने वेग येईल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.