वाशिम येथे 'वत्सगुल्म ग्रंथोत्सव'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:02 PM2018-12-15T15:02:05+5:302018-12-15T15:02:26+5:30
वाशिम: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसार होण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व विक्री, परिसंवाद, काव्यवाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवानिमित्त २२ डिसेंबर रोजी राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी आमदार विजयराव जाधव, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व्य. रा. बावणे, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. प्रज्ञा क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह पालकमंत्री मदन येरावार राहतील. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.