समृद्धीच्या वाहनाने पुलाला पडले भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:50+5:302021-08-13T04:46:50+5:30
राजुरा : परिसरातून गेलेल्या समृद्धी तथा अकोला-नांदेड महामार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या जड वाहनांमुळे ...
राजुरा : परिसरातून गेलेल्या समृद्धी तथा अकोला-नांदेड महामार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या जड वाहनांमुळे राजुरा रिधोरा रस्त्यावरील बेंदाडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने हा पूल अपघातास निमंत्रण बनला आहे.
गत पाच-सहा महिन्यांपासून खैरखेडा-रिधोरा रस्त्यावरून समृद्धी तथा अकोला-नांदेड महामार्ग निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात टिप्परद्वारा सुरू आहे. परिणामी या मार्गावरील बेंदाडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुलावर जबर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत दहा वर्षांपूर्वी लाखोंचा निधी खर्च करून या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, महामार्ग निर्मितीच्या वाहनाने पुलाची वाट लागल्याने रस्त्यावरून जड वाहतूक पूर्णत: बंद पडली आहे तर जड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था बघता नागरिकांचा रोष निर्माण होऊ नये म्हणून संबंधितांनी रस्त्यावरील खड्ड्यांत थातूरमातूर प्रमाणात मुरूम टाकून मलमपट्टी केल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा या मार्गावर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत, तर गौण खनिजाची वाहतूक करणारे चारचाकी वाहनसुद्धा रस्त्याच्या कडेला पलटी झालेले आहेत. या मार्गावरून राजुरासह सुदी, अनसिंग, सुकांडा, खैरखेडा आदी गावांतील शेकडोंच्या संख्येने दुचाकी तथा चारचाकी वाहने ये-जा करतात. रस्त्याची झालेली दयनीय अवस्था बघता राजुरा ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने अडवून एक दिवस वाहतूक बंद केली होती. तेव्हा संबंधितांनी रस्त्याची डागडुजी करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते, मात्र त्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यात केवळ मातीमिश्रित मुरूम टाकून मलमपट्टी केली तर आता रस्त्याच्या नदीवरील मुख्य पुलाचीच तोडफोड केल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
...........
गौण खनिजाची वाहने कुरळामार्गे वळवली
बेंदाडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरून आता जड वाहतूक करणे अशक्य असल्याने महामार्ग निर्मितीच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने कुरळामार्गे वळवली आहेत. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून कमकुवत असल्याने यासुद्धा रस्त्याची वाट लागणार असल्याने कुरुळा ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
......
महामार्ग निर्मितीच्या जड वाहतुकीमुळे रिधोरा-खैरखेडा रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेचा अहवाल यापूर्वीसुद्धा अनेकदा वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. आज या मार्गावरील पुलाच्या झालेल्या तोडफोडीची पाहणी करून अहवाल तत्काळ वरिष्ठांना सादर करण्यात येईल.
- डी. सी. खारोले,
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालेगाव
महामार्ग निर्मितीच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या वाहनामुळे राजुरा रिधोरा रस्त्यावरील पुलाची तोडफोड झाली आहे, शिवाय रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे व तुटलेल्या पुलामुळे जबर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीची गरज आहे.
- आरती प्रकाश बोरजे,
सदस्या, ग्रामपंचायत, राजुरा