शिवसेना तालुकाप्रमुखाकडून वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 05:28 PM2021-06-05T17:28:47+5:302021-06-05T17:30:32+5:30

Karanja News : राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार

Vehicle vandalism by Shiv Sena taluka chief | शिवसेना तालुकाप्रमुखाकडून वाहनांची तोडफोड

शिवसेना तालुकाप्रमुखाकडून वाहनांची तोडफोड

Next

कारंजा लाड : जालना ते पुलगाव या २८५ किलोमिटर अंतराच्या रस्ता दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून काम बंद करण्याची धमकी देऊन ४ जून रोजी तालुक्यातील मांडवा फाट्यानजिक शिवसेनेचे रिसोड तालुकाप्रमुख महादेव ठाकरे यांनी कामावरील वाहनांची तोडफोड केली. यामुळे ४० लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी व्ही.पी. शेट्टी कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रभाकर जवादे यांनी ५ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, कारंजा तालुक्यातील मांडवा फाटा ते पेडगावदरम्यान रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असताना महादेव ठाकरे यांनी २ जून रोजी प्रत्यक्ष येऊन काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे काम बंद करा, अन्यथा हात-पाय तोडून तुम्हाला घरी पाठवू, अशी धमकी दिली; मात्र त्यास न जुमानता काम सुरूच ठेवण्यात आले. दरम्यान, ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास ओग्ली पेवर, टेंडम रोलर, ब्रोझर व इतर वाहनांची महादेव ठाकरे व त्यांच्या सोबत आलेल्या इतरांनी तोडफोड केली व कामावर हजर असलेल्या कामगारांना धमकीदेखिल देण्यात आली, असे जवादे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

कामाची गुणवत्ता चांगलीच असल्याने काम बंद होणार नाही, असे सांगितल्यानंतर खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांकडून कपंनीच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. गवळी यांचे समर्थक स्वत:च्या फोनवरून गवळी किंवा त्यांच्या पी.ए.शी बोलण्यास सांगतात. या सर्व प्रकाराची तक्रार कारंजा व मंगरूळपीर पोलीसांत दाखल केली आहे.
प्रभाकर जवादे
प्रकल्प व्यवस्थापक, व्ही.पी.शेट्टी कपंनी

राष्ट्रीय महामार्गाचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्ही.पी. शेट्टी कंपनीला दिले आहे. कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने कामावर येऊन वाहनांची तोडफोड केली. रस्ता दुरूस्तीचे काम पावसाळयापुर्वी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणीही आडकाठी आणू नये. कामाची गुणवत्ता नियमित तपासली जाते. यापुढे असा प्रकार घडल्यास आम्ही स्वत: शासनाकडून तक्रार दाखल करू.
- अरविंद काळे
प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग

रिसोड तालुक्यातील कळगव्हाण ते चांडस या रस्त्यावर खड्डे पडले होते. रस्ता दुरूस्तीकरिता या भागातील जनतेने अनेकवेळा आंदोलने केली. आता रस्त्याची दुरूस्ती होत असून ती दर्जेदार असावी, यासाठी आग्रह धरला. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी खोटी तक्रार करून या प्रकरणात आम्हाला गोवण्याचा प्रयत्न केला आहे.
महादेव ठाकरे
तालुका प्रमुख, शिवसेना, रिसोड

Web Title: Vehicle vandalism by Shiv Sena taluka chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.